Friday 20 December 2019

MIL - माध्यमांसाठी लेखन SYBA Sem -3

MIL-SYBA
माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्ये

बातमीची व्याख्या :
२ .घटना घडल्यावर ती महत्वाची असल्यास तिचे निःपक्षपाती ,काटेकोर निवेदन म्हणजे बातमी .
३ .माणसाच्या वर्तमान स्थितीत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची क्षमता असलेली घटना म्हणजे बातमी असे म्हणता येईल .
बातमीचे मूल्य घटक :
१ .लढत : दोन व्यक्ती, प्राणी, परिस्थिती यांच्यामधील मारामारी, झुंज व त्यातील शौर्य , वीरवृत्तीचे विवेचन बातमीचे मूल्य वाढविते .
२ . प्रगती : सर्वसामान्यांना प्रगती हवी असते . स्वतःची, कुटुंब, समाज, देशाची प्रगती या विषयक बातमी यात आर्थिक विकास, विज्ञानातील शोध सारख्या विषयांचा समावेश होतो .
३ . व्यक्तिमहात्म्य : भारतात व्यक्तिमहात्म्य विशेषत्वाने आहे . राजकारण, समाजकारण, कला, क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांच्या आवडीनिवडीविषयक प्रकाशित होणाऱ्या बातम्यांना विशेष बातमीमूल्य असते .
४ . लोकरूची : समजात  घडणाऱ्या विविध घटना गुणवंतांचा सत्कार, परोपकार, पशूत्वाचे प्रदर्शन करणाऱ्या हिंस्त्र घटना यांना विशेष बातमी मूल्य असते
५ .समीपता :प्रसारीत होणाऱ्या बातमीचा विषय वाचकांच्या  समीप  असला तर त्या बातमीस  बातमी मूल्य  असते .
बातमीची रचना :
अग्रपरिच्छेद > महत्वाचा तपशील > पूरक तपशील > कमी महत्वाचा पण पूरक तपशील > अत्यंत कमी महत्वाची माहिती
               वरीलप्रमाणे बातमीची रचना असते . सर्वात महत्वाचा भाग अग्रपरिच्छेदात आल्यानंतर बातमीचे यथोचित विवेचन पुढे येते .
बातमीची भाषा :
१ . बातमीची भाषा ही साधी, सोपी, सुटसुटीत असावी .
२ . बातमी लेखनात पाल्हाळीकता असू नये त्यात अलंकारीक शब्द वापरु नयेत .
३ . बातमीतील घटना क्रमबद्ध असावी .
४ . बातमीची भाषा सूचक नसावी तर ती स्पष्ट असावी .
५ . बातमीची भाषा बोलकी , संवादक्षम सर्वसाधारणपणे साऱ्यांनाच चटकन समजेल अशी असावी .
६ . बातमीचे निवेदन वर्णनात्मक नसावे . कथनात्मक असावे .
७ .परभाषेतील शब्दांना पर्याय देतांना स्वभाषेतील प्रचलीत शब्दांचा उपयोग करावा .

बातमी लेखनाचे तंत्र :
१ . शीर्षक ( मस्तक रेषा-Head Line ) :बातमीचे शीर्षक एक किंवा दोन ओळीत असावे . वाचकांची उत्सुकता वाढेल या स्वरूपाचे बातमीचे  शीर्षक असावे .
२ . तिथी रेषा (Date line): तिथी रेषा म्हणजे दिनांक रेषा होय . बातमीस शीर्षक दिल्यानंतर ज्या गाव अथवा ठिकाणावरील घटना आहे . त्याचा उल्लेख बातमी लेखनात करावा . त्यांनंतर बातमीचा दिनांक व बातमीचा स्रोत यांचा उल्लेख केला जातो.
३ . अग्र परिच्छेद (लीड ) : वृतांताचा तपशील येथे कोण?, केव्हा?, कुठे?, काय?, का?, कसे? या सहा प्रश्नांच्या उत्तरांच्या उलगडयातून येत जातो .
४ . तपशील :वृतांतातीत महत्वाचा भाग, कमी महत्वाचा भाग व बातमीचा समारोप स्वतंत्र परीच्छेदात तपशील लेखनातून येतो .

जाहिरात लेखन : स्वरूप व उपयोजन
जाहिरात :व्याख्या व स्वरुप :
व्याख्या :
रवींद्र खोरे : आपली वस्तू अथवा पदार्थ विकण्यासाठी, लोकांपर्यंत माहिती अथवा संदेश पोहचविण्यासाठी जे माध्यम पैसे देऊन वापरले जाते त्याला जाहिरात असे आपण म्हणू .
ल . रा .नसिराबादकर : उत्पादित वस्तू सेवेकरिता मागणी निर्माण करणाऱ्या कलेला जाहिरात असे म्हटले जाते .

जाहिरातींचे प्रकार :
१) कलात्मक जाहिरात :
२) साधी जाहिरात :
३ ) छोट्या जाहिराती: यांना क्लासीफाईड असे देखील म्हणतात .पाहिजेत या सदराखाली प्रस्तुत छोटया जाहिरातींद्वारा उत्पादन अथवा माहिती, सेवा उद्योगाची माहिती प्रसारीत केली जाते .
४ ) सरकारी जाहिरात : जनहितार्थ स्वरूपाच्या सदर जाहिराती असतात. सरकारचे लोककल्याणकारी निर्णय 
५ ) उत्पादनांच्या जाहिराती :
६ ) संस्थात्मक जाहिराती :
७ ) लोकहितासाठी जाहिरात :
८ ) पुरवणी जाहिरात :
९ )रोल मॉडेल मार्फत जाहिरात :
जाहिरात लेखन : .
१ ) मथळा : जाहिरातीचा मथळा हा आकर्षक स्वरूपाचा असतो .
२ ) तपशील : जाहिरातीतील उत्पादनाविषयी 
३ ) घोषवाक्य :
४ ) मुद्रा :
वृत्तपत्रासाठी लेखन :
१ ) अग्रलेख :
२ )वृतांत लेखन :
३ ) स्तंभलेखन व सदरे :

माणदेशी माणसं : एक आकलन (डॉ.भूषण काटे)

१.नामा मास्तर -

      नामा हा लखकाचा मित्र गरीब दलित मातंग कुटुंबात जन्माला आलेला असा आहे .कथेच्या सुरुवातीला लेखक आपल्या माणदेशातील मुळ गावी जात असतांना सर्वीस मोटार मधुन सरुबाईच्या मठाजवळ उतरतो . पुढील पायवाट चालू लागतो . लोकल बोर्डाच्या शाळेजवळ त्याला आपला बालमित्र नामा भेटतो . दोघेही आपल्या बालपणीच्या गप्पांमध्ये रममाण होतात.नामा व लेखक एकाच प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असतांना नामाने वर्गात लावणी गातो. अगदी तमाशा कलावंतांप्रमाणे ठेका धरतो. शिक्षक मात्र त्याला खुप मारतात नामा रडतो, विव्हळतो. लेखक नामा सोबत त्याच्या घरी जातो.नामा ची आई नामाने शाळा सोडून द्यावी असे म्हणते व आपल्या मुलाला शिक्षकांनी एवढे मारले याचा राग व्यक्त करते. नामाचे वडील मात्र नामा ने शिक्षण घेवून नोकरी करावी या मताचे असतात. त्यांचं स्वप्न असते की नामाने शिक्षक बनाने, सरकारी नोकरी मिळवावी . आज लेखकाला नामा शिक्षकाच्या रुपात भेटला. त्याने जिद्दीने वडी लांचे स्वप्न पूर्ण केल्याचे लेखकाला समाधान वाटते. लेखक विचारतो की, वडीलांना तू शिक्षक बनल्याचे बघुन आनंद झाला असेल. पण शिक्षक पदाची ऑर्डर मिळण्याअगोदर दोन महिने वडीलांचे निधन झाल्याचे नामा सांगतो.नामा चे लग्न झालेले असून बायका पोरं गावीच असतात नामा इथे शाळेतच राहतो . आठवड्यातून एकदा घरी जातो. दोन-तीन दिवस पुरतील एवढया भाकरी सोबत आणतो त्या संपल्यानंतर तो स्वतःच्या हाताने स्वयंपाक करुन आपली भूक भागवतो.धनगर, कुणबी, माळी यांची वस्ती असलेल्या सदर शाळेत नामाला मान मिळतो पण पगार तुटपुंजाच असल्याची तो म्हणतो. लेखकाची व त्‍याची ती भेट पार पडते. पुढे၊ लेखक၊ मार्गस्थ होतो.
      बराच काळ लोटल्यानंतर . शहरात एके सायंकाळी लेखक निवांत असतांना त्याचा मित्र त्याला थिएटर अर्थात तमाशा बघण्यासाठी सोबत येण्यासाठी आग्रह करतो. प्रथमतः लेखक शहरी तमाशे फिल्मी गाण्यांवर आधारीत असल्याचे सांगत त्यात रस नाही म्हणून नकार देतो. शेवटी मित्राच्या आग्रहास्तव तमाशा बघायला जातो.कथेत पुढे तमाशा थिएटर बाहेरील व आतील जल्लोष व उत्साह याचे वर्णन येते. लेखक व त्याचा मित्र वरच्या वर्गाचे तिकीट खरेदी करुन अगदी विंगेजवळ बसलेले असतात. पहिला भाग पार पडतो आणि अचानक नामा हातात तुणतुणे घेऊन विंगेतून मंचावर ऐटीत उडी घेतो.नामा एक अस्सल कलावंत कला सादर करतो. लेखक आश्चर्यचकित होवून नामाला मोठ याने आवाज देतो. खेळ आटोपल्यावर दोघांची भेट होते. नामा शाळेतला सरकारी मास्तर ते तमाशातला मास्तर असा आपला प्रवास कथन करतो.१ोवटी नामा मास्तर या आपल्या मित्राने त्याचे ध्येय गाठल्याचे बघुन लेखकाला समाधान वाटते.



२. कोंडीबा गायकवाड -

     प्रस्तुत कथेत लेखक सुरुवातीला आपल्या गावातील गायकवाड लोकांची ख्याती सांगतो. सदर गावात आडदांड वृत्तीमुळे कायमच लाठ्या - काठ्या घेवून हाणामाऱ्या होत असतात . एवढेच नव्हे तर वर्षा काठी एखादा खून देखील या गायकवाडांच्या गावात होतो. अशा या गावात लेखकाची वडीलोपार्जीत १ोती कसण्यासाठी कोंडीबा गायकवाड या इसमास नफ्याने दिलेली
 असते. कोंडीबाकडे लेखक गेल्या वर्षीच्या आपल्या हिशेबाचे पैसे घेण्यासाठी जातो. कथेत कोंडीबाच्या घरात जेव्हा दोघांची भेट होते तेव्हा कोडीबाच्या  बलदंड १ारीराचे वर्णन येते. लेखक कोडीबाला भेटतो तेव्हा त्‍याच्या हाताची बोटे जखमी झालेली असतात. लेखक जेव्हा विचारतो तेव्हा पूर्ण प्रकरणाचा उलगडा कथेत पुढे होत जातो.कोडीबा करीत असलेली लेखकाची १ोती त्याच्या भावाला हवी असते पण लेखकाचा परीवार व कोंडीबा यांचे विश्वासपूर्ण संबंध असल्यामुळे कोडीबालाच वर्षानुवर्ष ते १ोती कसण्यासाठी देतात.कोंडीबाचा भाऊ नेमकी यांच्या १ोजारील कसण्यासाठी नफ्याने मिळवतो व कोंडीबाबद्दल मनात असणारा द्वेषभाव त्याच्या वर्तनावरून वेळोवेळी व्‍यक्त होत जातो.कोंडीबाला हाताला जखम होण्यामागे देखील तेच कारण असते.कोडीबाची गुरंढोरं चुकून भाऊ कसत असलेल्या शेजारील शेतात कुंपण ओलांडून शिरतात त्याचा संताप होऊन कोंडीबाचा भाऊ व त्याची मुले कोंडीबावर लाठयाकाठ्यांनी हल्ला चढवितात . तो मार आपल्या दोन्ही हातांनी चुकवितांना कोंडीबाची हाताची बोटे जखमी होतात . कोंडीबा  लेखकाजवळ भावाचा बदला घेणार असल्याची भावना बोलून दाखवितो . लेखक शेताचे गेल्या वर्षीचे पैसे मागतो तेव्हा मात्र कोंडीबा गायकवाड सध्या पैसे नसल्याचे सांगतो व नंतर पूर्ण पैसे देणार असल्याचे देखील सांगतो . लेखकाला व त्यांच्या कुटुंबियांना कोंडीबाच्या एकंदरीत विश्वासू आणि प्रामाणिक पणाबाबत खात्री असते . पण तरीही पैसे मिळविण्यासाठी इतक्या दूर गावावरुन वारंवार खेपा घालाव्या लागतात अशी सबब लेखक कोंडीबा जवळ बोलून दाखवतो .

३  झेल्या : -
       लेखक काही काळ माणदेशातल्या निंबवडे या काहीशा दूर्गम परीसरात असलेल्या गावात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस होते . अर्थात त्या शाळेतील नियमीत शिक्षक तीन महिन्यांसाठी रजेवर असल्या कारणाने लेखकाची हंगामी, तात्पुपुरत्या स्वरुपाची नियुक्ती निंबवडे गावाच्या सरकारी शाळेत झाली होती .लेखकाची आर्थीक स्थिती नोकरी उपजिवीकेबाबतचे अस्थैर्य त्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर कथेतून अभिव्यक्त होते .
   निंबवडे गावच्या शाळेत शिक्षक म्हणून लेखक उपस्थित असतांनाचा पहिला दिवस प्रस्तुत कथेतून  पाहिल्याच प्रसंगातून वाचकांसमोर येतो .  दुसरी आणि तिसरीचा वर्ग असणारी एक शिक्षकी शाळा असते . लेखक विद्यार्थांसमोर हजेरी घेण्यास सुरुवात करतो . मुले अगदी रुळलेल्या पध्दतीने हजेरी देतात . जालंदर लोहार नावाचा पुकारा होताच सर्व मुले गोंगाट करीत . 'झेल्या ' हा किती व्रात्य मुलगा आहे व शाळेला दांडया मारून कसा गावात , रानात , ओढयावर खोडया काढीत हिंदळत फिरतो याचे वर्णन करतात .
    दोन्ही वर्गांची हजेरी घेतली गेल्यानंतर लेखक थोडी थोराड व चांगल्या देहयष्टीची तीन -चार मुले जालंदर उर्फ झेल्याला शाळेत आणवण्यासाठी पाठवतात . शाळा सुरुच असते काही वेळानंतर झेल्याला वर्गासमोर व विद्यार्थ्यासमोर आणले जाते . लेखक या प्रसंगाचे -घटनेचे वर्णन असे करतो की, जणू एखाद्या गुन्हेगाराला न्याययंत्रणा व समाजासमोर उभे करतात . तसे झेल्याला आणवल्यानंतरचे वातावरण होते .सदर वर्णन समर्पक देखील वाटते . शिक्षक आणि संपूर्ण वर्गासमोर उभा असलेला झेल्या एखाद्या सराईता प्रमाणे आता मास्तरकडून मार मिळेल या नेहमीच्या तयारीने उभा राहतो . पूर्ण शाळा आता गंमत बघायला मिळणार या अपेक्षेने तयारीत असते .परंतू मास्तर मात्र सदरची मारझोड- शिक्षा ही पारंपरीक पध्दत न वापरता झेल्याच्या भावस्थितीचा वेध घेतात .झेल्याच्या दोन्ही खिशात कोंबलेल्या चिंचा त्याच्याकडून ' स्वतःला हव्या आहेत ' म्हणून मागून घेतात .झेल्याला आपलेसे करत त्याला व्दाड विद्यार्थी म्हणून हटकून न देता .इतर विद्यार्थी, शाळा, शिक्षक यासर्व घटकांशी समरस करून घेतात . त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो . कथेत पुढे झेल्याच्या वर्तनात, स्वभावात  व एकंदरीत वागण्यात विलक्षण गतीने सकारात्मक स्वरुपाचे परीवर्तन घडते .लेखक /शिक्षक शाळेच्याच मागच्या एका खोलीवजा जागेत राहतात .झेल्या त्यांची अगदी मनोभावे सेवा करू लागतो . खोली स्वतःच्या हाताने सारवून देणे, शेजारील वस्तीवरून दूध आणून देणे, कामात मदत करणे ई .झेल्याचा अंगी असणारा व्रात्य पणा कोमेजून त्याच्याऐवजी नम्रता, सेवाभाव, वेळेचे महत्व , सकारात्मक दृष्टीकोन, संयम, दृढता व प्रगल्भता या सदगुणांचा विकास होवू लागतो . लेखकाची शिक्षक पदासाठी नियुक्ती केवळ  तीन महिन्यांच्या कालावधीसाठी झालेली असते . कालावधी पूर्ण झाल्यानंतर तेथून  जाण्याची वेळ येते .झेल्या मात्र पूर्णपणे दुःखी -कष्टी बनतो . लेखक त्याला नियमित शाळा व शिक्षण सुरू ठेवण्याचे सांगून हायस्कूल मध्ये गेल्यावर शहरात आल्यावर तिथे मीच शिक्षक असणार असे खोटे सांगतो . लेखकाला देखील स्वतःचे भवितव्य , उपजीविका याविषयी चिंता असतेच . पण कथेच्या शेवटी लेखक झेल्याशी आयुष्यात पुन्हा भेट न झाल्याचे सांगत हळहळ झेल्याविषयी व्यक्त करतो .कयास / अंदाज व्यक्त करतो की, झेल्याने आपले शिक्षण पूर्ण केले असेल काय ? झेल्या आपला पारंपरीक लोहाराचा व्यवसाय करीत असेल काय? प्रस्तुत कथेतून लेखक आयुष्याच्या वाटेवर भेटणाऱ्या झेल्यासारख्या व्यक्तिरेखेबाबतच्या स्मृती त्याच बरोबर काळजी व्यक्त करतो .


४   बन्या बापू : 
माणदेशी माणसं या व्यंकटेश माडगूळकर यांच्या अक्षर ग्रंथ ठरलेल्या कथासंग्रहातील बन्याबापू या कथेतून बन्याबापू या घरंदाज प्रतिष्ठीत वयाची सत्तरी पार केलेल्या व्यक्तिचे चित्रण येते . गावात देशमुख , इनामदारांचे टोलेजंग वाडे पूर्वी असायचे लेखक म्हणतो आताच्या काळात ठरावीक गावांमध्ये वाडे बघावयास मिळतात . प्रस्तूत कथेतील वाडा दुरुन अडगडीची वास्तू वाटत असली तरी थोडया आत शिरल्यावर दिवानखाना सोफा भिंतीवर लटकवलेली बंदूक आणि बन्याबापू यांचे दर्शन होते .बन्याबापूंचे स्वभाव वैशिष्टये पुढे कथेत माडगूळकर चित्रित करतात .एवढया प्रशस्त जुन्या वास्तुत बन्या बापू , त्यांची विधवा सून व अडाणी - वेडसर पुतण्या हे तिघे जण राहतात .जुनी श्रीमंती बन्याबापुंच्या वागण्या -बोलण्यातून जाणवते पण सध्या ते दारिद्रयात जगत असल्याचेही दिसून येते . बन्याबापुंच्या गप्पा या ठरावीक अशा पठडीतल्या असल्याचे जाणवते . लेखक पुढे निवेदनातुन बन्याबापुंचे व्यक्तीचित्र रेखाटतांना त्याकाळातील घरंदाज कुटुंबांची इंग्रजी सत्ते च्या कालखंडात कशी वाताहात होत गेली याचे मर्मभेदी चित्रण अगदी बेमालूमपणे करतात. प्रस्तुत कथा कलात्मक पध्दतीने पुढे सरकत जाते. पण त्यातुन अवघा राजकीय, सामाजिक व आर्थिक पट सूचक अर्थाने अभिव्यक्त होतो.जामिनीचे काही तुकडे आता बन्या बापुंकडे शिल्लक आहेत. बाकी च्या जामिनी विकून त्यांनी गुजराण केली.आपला खानदानी खाक्या टिकवला. गावात बन्याबापुंच्या शब्दाला मान-किंमत आहे . कथेच्या १ोवटी गांधी वधोत्तर उसळलेल्या दंगलीत दंगेखोरांकडून बन्या बापुंचा वडीलोपार्जीत वाडा पेटवून दिला जातो. स्वाभिमानी बन्याबापु १ोतात झोपडी वजा घर करुन राहतात. जुन्या घराण्यांची होत गेलेली वाताहात. त्यांचा पारंपरीक डामडौल याचे चित्रण माडगूळकर मनोविश्लेषणाच्या पातळीवर प्रस्तुत कथेतुन माडगूळकर करताना दिसतात.
५ . धर्मा रामोशी :
    धर्मा रामोशी या कथेत धर्माच्या दारिद्रयमय जीवनाची व्यथा वेदना माडगूळकर चित्रित करतात . रामोशी अर्थात रामवंशी हा माणदेश - महाराष्ट्राच्या ग्रामव्यवस्थेत प्राचीन काळापासून वास्तव्य करून असलेला समाज आहे .प्रस्तुत कथेतून माडगूळकर  धर्मा या दारिद्रयात जगत असलेल्या दलित दुबळ्या व्यक्तिचे चित्रण करतात


Wednesday 30 January 2019

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार,
प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या अभ्यासक्रमासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अभ्यास मंडळाने संपादीत केलेले काव्यांकुर हे पुस्तक नेमलेले आहे.